चिपळूण: पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या अद्वितीय खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या अजिंक्य भारतीय संघात चिपळूण तालुक्यातील प्रतिभावान खेळाडू शुभम शिंदे याने प्रतिनिधीत्व करत भारताच्या सुवर्ण विजयात अत्यंत मोलाचे योगदान दिले. आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर देशाचा तिरंगा फडकवत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या शुभमच्या या दिमाखदार यशामुळे चिपळूण तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा जगतात प्रचंड अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून चिपळूणमध्ये परतलेल्या सुवर्णपदक विजेत्या शुभम शिंदे याचे स्थानिक क्रीडाप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले. चिपळूणचे नगराध्यक्ष तथा रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी शुभमची विशेष भेट घेऊन त्याचा यथोचित सत्कार केला व भावी क्रीडा प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कबड्डीशी दीर्घकाळ जोडले गेलेले नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुभमच्या खेळाचा गौरव करताना चिपळूणच्या मातीत सराव करून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणे ही संपूर्ण कोकणासाठी भूषणावह बाब असल्याचे नमूद केले. शुभमने कठोर मेहनत, अफाट जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर भारतीय संघात स्थान पटकावले असून, त्याचे हे यश ग्रामीण भागातील नवोदित कबड्डीपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी नवी ऊर्जा व प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्यास प्रसिद्ध व्यावसायिक अरुण भोजने, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेविका राणी महाडिक, नीलम जाधव, नगरसेवक गणेश आग्रे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, करामत मिठागरी, सुधाकर सकपाळ, संदेश गोरिवले, फैसल मेमन, भाऊ भाटकर, जॉन महाडिक, बाबू गोलांबडे, नरेश सोळंकी आणि वसीम चिपळूणकर यांच्यासह शहरातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावून देशाच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी मानाचा तुरा रोवला असून, शुभम शिंदेने आगामी काळातही अशीच देदीप्यमान कामगिरी करत देशाचा व चिपळूणचा नावलौकिक वाढवत राहावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.







