चिपळूण : प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असलेल्या एसटी चालकाकडूनच स्टेअरिंग हातात असताना वारंवार मोबाईल फोनवर संवाद साधला जात असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार चिपळूण-बेळगाव मार्गावर समोर आला आहे. एमएच १४ एलएक्स ४२१५ (MH 14 LX 4215) क्रमांकाच्या बसमधील चालकाने वाहन चालविताना फोनवर बोलत प्रवाशांच्या जीवाशी उघडपणे खेळ मांडल्याने प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एसटीतून दररोज हजारो नागरिक विश्वासाने प्रवास करतात; अशा वेळी चालकाचे थोडेही दुर्लक्ष किंवा एक लहानशी चूक मोठी दुर्घटना घडवून रस्त्यावरील इतर वाहनांसह शेकडो निष्पापांचा जीव धोक्यात घालू शकते, या वास्तवाचा विसर संबंधित चालकाला पडल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित बस चिपळूण बसस्थानकातून मार्गस्थ झाल्यानंतर प्रवासादरम्यान चालकाने चालू गाडीत मोबाईल फोनवर कॉल्स अटेंड करण्यास सुरुवात केली. विशेषतः कोयना ते पाटण दरम्यानच्या घाट आणि वळणावळणाच्या संवेदनशील प्रवासात चालकाने तब्बल दोन वेळा फोन उचलून थेट संभाषण करतच बस हाकल्याचे बसमधील प्रवाशांच्या थेट निदर्शनास आले. चालकाचे अशा प्रकारे एकाग्रता सोडून मोबाईलकडे लक्ष जाणे प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा सुरुंग लावणारे ठरले असून, यामुळे बसमध्ये भीतीचे व नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या निष्काळजी प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आता थेट एसटी महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागितली आहे. प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२६ च्या या गंभीर प्रकाराची तात्काळ सखोल अधिकृत चौकशी करावी, वस्तुस्थिती तपासून आरोप सिद्ध झाल्यास अशा बेजबाबदार चालकावर सेवानियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. आता महामंडळाचे अधिकारी या प्रकरणी काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




