राजापूर/ तुषार पाचलकर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राजापूर तालुक्यातील मूर साईबाबा मंदिर ते वाळवड साईबाबा मंदिर या महत्त्वाच्या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला अखेर प्राथमिक सर्वेक्षणाच्या रूपाने गती मिळाली आहे. रस्त्याचे रीतसर अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने जी. धनवडे साहेब यांच्या पथकाने मूर आणि वाळवड गावात प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची सविस्तर पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, हा रस्ता मार्गी लागल्यानंतर परिसरातील नागरिकांची दळणवळणाची सोय अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
रस्त्याच्या प्राथमिक पाहणीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिधाली मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश गुरव, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, विहान खानविलकर, मूर गावचे शाखाप्रमुख केशव गुरव, महेश कोलते, जवळेथर गावचे माजी सरपंच सुरेश मोरे यांच्यासह स्थानिक गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, परिसरातील इतर मान्यवर आणि मूर-वाळवडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावर सुरू झालेल्या या हालचालींमुळे आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आशेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसराच्या सर्वांगीण विकासाला खरी चालना द्यावी, अशी जोरदार अपेक्षा आता स्थानिक जनतेकडून व्यक्त केली जात आहे.






