रत्नागिरी: शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सुभाष रोड परिसरातील श्रीराम टॉकीज समोरील घरातून एका ४३ वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयिताचा कसून शोध घेत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुभाष रोड येथील रहिवासी शिवाजी मारुती मोरस्कर (वय ५०) यांच्या पत्नी सौ. आरती शिवाजी मोरस्कर (वय ४३, शिक्षण आठवी) या दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी होत्या. त्यावेळी अज्ञात कारणावरून एका अज्ञात इसमाने त्यांना घरातून फूस लावून अथवा जबरदस्तीने पळवून नेले. कुटुंबीयांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
अखेर फिर्यादी शिवाजी मोरस्कर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.५६ वाजता अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७६/२०२६ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास यंत्रणा संशयिताचा माग काढत आहे. भरवस्तीतून अशा प्रकारे विवाहितेचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.






