रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय (डीओटी) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत जागतिक पर्यटन दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मारुती मंदिर परिसरातील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली. यंदाचा पर्यटन दिन ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणार आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात मनमोहक समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळेसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र, गडकिल्ले, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, फेसाळणारे धबधबे आणि जगप्रसिद्ध कातळशिल्पे अशी पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक वैशिष्ट्ये आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात दर्जेदार सोयी-सुविधांची उभारणी करणे, स्थानिक पातळीवर जनजागृती निर्माण करणे आणि स्थानिक कला-संस्कृतीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पाच महिला व पाच पुरुष अशा एकूण १० व्यक्तींना ‘पर्यटन मित्र’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
शासनाने नुकतेच नवीन पर्यटन धोरण जाहीर केले असून, यामध्ये पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विविध आकर्षक सबसिडी जाहीर करण्यात आल्या आहेत; याबाबत तज्ज्ञांमार्फत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच स्थानिक व शासन पातळीवर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या व्यासपीठावरून महत्त्वाच्या मागण्या मांडून मंत्रालय स्तरावर त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेला सर्व पर्यटनप्रेमी, व्यावसायिक, टुरिस्ट गाईड, पर्यटक वाहन चालक, हॉटेल व्यावसायिक, आंबा बागायतदार, होमस्टे व हाऊस बोट संचालक, स्थानिक कलाकार आणि पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजू भाटलेकर, सुहास ठाकुरदेसाई, नंदू तांबे, मकरंद केसरकर आणि कातळशिल्पतज्ज्ञ भाई रिसबूड यांनी केले आहे.





