रत्नागिरी : जिल्ह्यातील अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या सर्वसामान्यांच्या अर्जांचा आणि प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून सर्व विभागांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत बिल्डरविरोधात दाखल झालेल्या एका तक्रारीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा घेण्यात आला. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन ही महत्त्वाची संधी असून सर्व विभागांनी एका आठवड्याच्या आत आपले दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे व निधी जमा करून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले.
या लोकशाही दिनाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.






