रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तिघा तरुणांना शहर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून महागडा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजासह एक रिक्षा आणि दुचाकी असा एकूण ४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. साहिल समीर सोलकर (वय २७, रा. कोकण नगर, रत्नागिरी), सुफियान अनिस गुहागरकर (वय २५, मूळ रा. पडवे दखनी मोहल्ला, ता. गुहागर, सध्या रा. आझाद नगर, कोकण नगर, रत्नागिरी) आणि यशराज राजेश देसाई (वय २४, रा. गणेश कॉलनी, हातखंबा, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पांडुरंग आखाडे (ब.नं. ५३८) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना १० ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.३५ वाजण्याच्या सुमारास वूमेन्स हॉस्पिटल ते चंपक मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर, लेप्रसी कॉलनीसमोरील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या परिसरात तिघजण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशय बळावल्याने त्यांची चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात हिरव्या-काळ्या रंगाचा, उग्र वासाचा पाला, फुले, काड्या व बोंडे असलेला वनस्पतीजन्य महागडा हायड्रोपोनिक गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख २० हजार ७५० रुपये किमतीचा ३४.५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा, १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची मॅक्झिमा मॅक्स रिक्षा (क्रमांक एमएच ०८ बीसी ०१५०) आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची सुझुकी बर्गमॅन दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एझेड ८२१८) असा एकूण ४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब), ११ (अ) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा अंमली पदार्थ त्यांनी कुठून आणला होता आणि तो कोणाला विकला जाणार होता, या दृष्टीने शहर पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.





