मुंबई : गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साधारण १० तासांचा प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गाड्यांच्या विलंबामुळे तब्बल ११ ते १२ तास अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबईहून कोकणच्या दिशेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासात या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याने विशेष रेल्वेचा उद्देशच फोल ठरत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
कुडाळ स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर एक्स्प्रेस तब्बल ११ ते १२ तास विलंबाने दाखल झाली. याशिवाय अन्य अनेक गाड्यांच्या वेळेतही मोठा फरक पडला असून काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून, तासन्तास गाडीची प्रतीक्षा करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्या चालवल्या जात असल्या तरी वेळापत्रकातील विस्कळीतपणामुळे प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने धावणाऱ्या कोकण कन्या, तुतारी आणि जनशताब्दी यांसारख्या नियमित गाड्यांनाही तीन ते चार तासांचा विलंब होत आहे. काही गाड्या आठ तासांहून अधिक उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिकच त्रासदायक झाला आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी वेळेत गाव गाठण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना रेल्वेच्या विलंबामुळे अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी, लहान मुले आणि वृद्ध यांचे विशेष हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा, विशेष गाड्या वेळेत धावाव्यात आणि रेल्वे प्रशासनाने विलंबाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहाने निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वेच्या या विलंबामुळे मात्र प्रवासाच्या सुरुवातीलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप
Leave a Comment





