रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते आणि पुलांच्या बांधकामाला आर्थिक बळ देत विकासकामांना गती देण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर १३८ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांना या रकमेचे वितरण करण्याची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपलब्ध झालेल्या एकूण तरतुदीमध्ये ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गांच्या कामांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
विभागीय वाटपाचा विचार करता, उत्तर रत्नागिरी विभागाने चिपळूण विभागाच्या तुलनेत निधी मिळवण्यात मोठी आघाडी घेतली आहे. उत्तर रत्नागिरी विभागाला विविध कामांसाठी तब्बल ८२ कोटी ६० लाख ५२ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत, तर चिपळूण विभागाच्या वाट्याला ५५ कोटी ५५ लाख ३० हजार रुपयांचा निधी आला आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा मार्गांच्या सुधारणेसाठी दोन्ही विभागांना मिळून सर्वाधिक ८८ कोटी ४४ लाख २२ हजार रुपये मिळाले असून त्यात उत्तर रत्नागिरीला ४४ कोटी ६३ लाख ७१ हजार आणि चिपळूणला ४३ कोटी ८० लाख ५१ हजार रुपयांचा समावेश आहे. तसेच याच प्रमुख जिल्हा मार्गांवरील पुलांच्या उभारणीसाठी एकूण १९ कोटी ८१ लाख ३८ हजार रुपयांची तरतूद झाली असून, त्यातील १५ कोटी ८ लाख २ हजार रुपये उत्तर रत्नागिरीला तर ४ कोटी ७३ लाख ३६ हजार रुपये चिपळूण विभागाला देण्यात आले आहेत.
दुसऱ्या बाजूला राज्य मार्गांच्या बांधकामासाठी दोन्ही विभागांना मिळून १५ कोटी ६७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी उत्तर रत्नागिरीला ११ कोटी ६० लाख २८ हजार आणि चिपळूणला ४ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये वर्ग झाले आहेत. याशिवाय राज्य मार्गांवरील पुलांच्या कामांसाठी १४ कोटी २२ लाख ९८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामध्ये उत्तर रत्नागिरी विभागाला ११ कोटी २८ लाख ५१ हजार तर चिपळूण विभागाला २ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप सुरू झाल्याने दीर्घकाळापासून रखडलेल्या कामांना नवी दिशा मिळाली असली, तरी हा निधी प्रत्यक्ष जमिनीवर किती वेगाने खर्च केला जातो आणि रस्ते-पुलांची कामे नियोजित मुदतीत पूर्णत्वास जातात का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






