रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या पार्श्वभूमीवर सागरी सीमा मंच, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या पुढाकाराने मांडवी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सामाजिक संस्था, पर्यटन संस्था, उद्योग, व्यापारी संघटना, शासकीय विभाग, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सुमारे 2.5 टन कचरा संकलित केला.
19 ते 26 सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील 20 समुद्रकिनाऱ्यांवर ‘स्वच्छ सागर अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मांडवी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. गौरी-गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या आणि अन्य कचरा जमा झाला होता. स्वयंसेवकांनी हा कचरा संकलित करून किनारा स्वच्छ केला. संकलित कचऱ्यापैकी सुमारे दीड ट्रॅक्टर कचरा नगरपरिषदेच्या माध्यमातून वाहून नेण्यात आला.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. मांडवी किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. सागरी सीमा मंचाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी स्थानिक नगरसेवक बंटी किर, राजीव किर, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी बेहरे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. अभियानातून जमा झालेला कचरा नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वाहनाद्वारे नेला.
महाराष्ट्र सागरी मंडळ बंदर विभाग रत्नागिरी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, मांडवी पर्यटन संस्था, रत्नागिरी पर्यटन संस्था, लघु उद्योग फिश इंडस्ट्रीजचे कर्मचारी, लायन्स क्लब रत्नागिरी, रत्नागिरी शहर व्यापारी संघ, रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद–रत्नागिरी जिल्हा, श्री देव भैरी देवस्थान मांडवी, मैत्री ग्रुप–हॉटेल सी फॅन मांडवी, रा. स्व. संघ सेवा विभाग, सागरी सीमा मंच यांच्यासह स्थानिक नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला.
अभियानासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या वतीने रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली होती. लायन्स क्लब रत्नागिरीने मल्टी युटिलिटी वेस्ट कलेक्शन बॅग आणि हँड ग्लोव्हज उपलब्ध करून दिले.
यावेळी उपस्थित संस्था, मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांना सागरी सीमा मंचाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. मांडवी बीच प्रमुख तथा हॉटेल सी फॅनचे संचालक सुहास ठाकूर देसाई यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
दरम्यान, सागरी सीमा मंचाने जयगड ते आंबोळगड या किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील 20 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. 19 सप्टेंबर रोजी कोस्ट गार्डच्या माध्यमातून भाट्ये समुद्रकिनारी झालेल्या स्वच्छता अभियानात सागरी सीमा मंचाचे जिल्हा कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर मांडवी येथे अभियान घेण्यात आले.
उर्वरित समुद्रकिनाऱ्यांवर 26 सप्टेंबर रोजी स्थानिक ग्रामपंचायती, शासनाचे विविध विभाग, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सहकार्य मिळणार आहे. समुद्रात कचरा जाण्यापासून रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण जनजागृती निर्माण करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिकांसह शासनाचे विविध विभाग, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि विविध मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सागरी सीमा मंच, दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित
Leave a Comment





