दाभोळे/सिकंदर फरास : पंचशील ज्ञान प्रबोधिनी संचलित माध्यमिक विद्यालय दाभोळे येथील मुख्याध्यापिका चित्रा बाजीराव कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज शाळेत अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. दाभोळे परिसरातील शैक्षणिक प्रवासात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या या आदर्श आणि गौरवशाली सेवेचा सत्कार करण्यासाठी या विशेष आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे संस्थापक संजय कांबळे यांच्या माध्यमातून ७ जून १९९८ रोजी ज्ञानरूपी हे रोपटे या भागात रोवण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांनी आपले शिक्षक म्हणून कार्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडले. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली शिकून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उच्च शिखरे गाठली आहेत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी नेहमीच शैक्षणिक व इतर क्षेत्रात पुढे राहावा यासाठी त्यांनी सदैव अपार मेहनत घेतली.
या गौरव सोहळ्यासाठी दाभोळेसह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा क्षण उपस्थित सर्वांसाठीच अत्यंत भावनिक होता. शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि नागरिक मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त भारावून गेले होते. त्यांच्या पुढील सुखकर, आरोग्यदायी आणि दीर्घ आयुष्यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
माध्यमिक विद्यालय दाभोळेच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
Leave a Comment





