गणपतीपुळे (वैभव पवार) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणीची विशेष सभा वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहार येथे तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह गावागावात पक्षाच्या शाखा स्थापन करणे आणि विभागनिहाय संघटन अधिक सक्षम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला कोकण प्रदेश प्रवक्ते भाई जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा सदस्य रजत पवार, ज्येष्ठ सदस्य विजय आयरे, दिनकर कांबळे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात पक्ष संघटन विस्तारासाठी व्यापक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रत्येक गावात पक्षाची शाखा उभारण्याबरोबरच विभागवार संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्याचे ठरविण्यात आले. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची वेळ घेऊन तालुक्यात जाहीर मेळावा आयोजित करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी वाशी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. वाटद विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, कोतवडे विभागीय अध्यक्षपदी सिद्धार्थ आयरे, कोतवडे उपाध्यक्षपदी हेमंत कांबळे व जयगड शाखाध्यक्षपदी उमेश सावंत, तर निवेंडी शाखाध्यक्षपदी मीनानाथ कदम यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार करत गावपातळीवर संघटन मजबूत करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सभेच्या शेवटी सचिव उज्वला कांबळे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.






