दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खेड येथे सुमारे २० कोटी रुपये खर्चून भव्य ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उभारण्यात येणारे हे केंद्र जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी महत्त्वाचे व्यावसायिक व्यासपीठ ठरेल, अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दिली.
दापोली तालुक्यातील देगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांतर्गत संजीवनी महिला प्रभाग संघ, असोंड यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राज्यमंत्री कदम बोलत होते.
महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता यावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले. दापोली मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच महिला सक्षमीकरणालाही आपण प्राधान्य देत असून, हे काम आपली कौटुंबिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शहरांपासून दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक ग्रामसंघ सक्षम आणि स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी आपला विशेष प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून एक मॉल उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेला उमेद मॉल खेड येथे साकारण्यात येणार आहे. सुमारे २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना एकाच ठिकाणी विक्रीची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र आणि मोठे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देगाव येथे सुरू झालेले संजीवनी महिला प्रभाग संघाचे कार्यालय हे ग्रामीण भागातील पहिले प्रभाग संघ कार्यालय असल्याचेही कदम यांनी नमूद केले. या परिसरातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य ममता शिंदे आणि नरेश घरटकर हे प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा महिला संघटिका रोहिणी दळवी, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष अमित पारदुले, सभापती उन्मेष राजे, समाजकल्याणचे माजी सभापती भगवान घाडगे, तालुका महिला संघटिका दीप्ती निखारगे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, संपर्कप्रमुख प्रदीप जाधव, उपतालुकाप्रमुख अनंत करबेले, सिनेट सदस्य सुनील दळवी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर व ममता शिंदे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, समन्वयक विश्वास खांबे, विभाग प्रमुख मोहन भागणे, दिनेश जावळे, सामाजिक कार्यकर्ते फरमान बटे, मुंबई संघटक शांताराम खळे, सुनील चव्हाण, देगावच्या सरपंच अनुराधा भोसले, फणसूच्या सरपंच रेखा खोपटकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, उमेद अभियानाचे प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






