रत्नागिरी : शासकीय योजना, आर्थिक मदत आणि शेतीविषयक विविध कामांसाठी शेतकऱ्यांना आता सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नसून, केंद्रीय कृषी विभागाने सुरू केलेले ‘ॲग्री वेल्फेअर पोर्टल’ बळीराजासाठी मोठे डिजिटल व्यासपीठ ठरत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार असून, पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, खते-बियाणे आणि विविध शासकीय अनुदानांची सर्वसमावेशक माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना या सुविधेचा थेट आणि मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून पोर्टलवरील संपूर्ण मजकूर अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत तयार करण्यात आला असून, या डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करता यावा यासाठी संबंधितांना तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी agriwelfare.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला आधार क्रमांक आणि मोबाईल ओटीपीच्या साहाय्याने लॉगिन केल्यास सर्व शेतीविषयक योजना व अनुदानांची अद्ययावत माहिती तत्काळ प्राप्त करता येईल.





