रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील एका गोदामात धान्याची गाडी खाली करत असताना अचानक चक्कर येऊन पडलेल्या एका ४३ वर्षीय हमालाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश लक्ष्मण पाटील (वय ४३, मूळ रा. हत्तरगी, हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक; सध्या रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे मृत पावलेल्या हमालाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शारदा रोडलाईन येथे कार्यरत असलेले संतोष भागवत शेळके हे कामावर येणाऱ्या हमालांना कामाचे वाटप करतात. नेहमीप्रमाणे १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रकाश पाटील हे हमालीच्या कामासाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांना एमआयडीसी येथील धान्याच्या गोदामात आलेल्या धान्याच्या गाड्या खाली करण्याच्या कामावर पाठवण्यात आले होते. दुपारी गोदामात गाडी रिकामी करण्याचे काम सुरू असताना अचानक प्रकाश पाटील यांना चक्कर आली आणि ते खाली बसले. काही वेळातच त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
उपस्थित सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून दुपारी ३.४३ वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती संतोष शेळके यांनी पोलिसांना दिल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९४/२०२६ अशी नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





