राजापूर / तुषार पाचलकर: तालुक्यातील बहुचर्चित जामदा धरण प्रकल्प भूसंपादनात अस्तित्वात नसलेली झाडे दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला लाटल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी मनसेचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जामदा धरण प्रकल्पाच्या अनुषंगाने जमिनीवरील झाडे, फळझाडे व इतर घटकांच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही झाडे नसताना कागदोपत्री खोटी झाडे दाखवून काही खातेदारांनी शासनाकडून मोबदला लाटल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. आता या गैरव्यवहाराची प्रशासकीय पातळीवर चौकशी होण्याची शक्यता निर्माण होताच, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ब्राह्मण खोऱ्यातील संबंधित जमिनींवर सध्या युद्धपातळीवर नवीन काजू लागवड सुरू करण्यात आल्याचे मनसेने तक्रारीत अधोरेखित केले आहे.
हा संपूर्ण गैरव्यवहार केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित नसून यात संबंधित शेतकरी, दलाल आणि शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा थेट आरोप मनसेने केला आहे. शासनाकडून पूर्वीच झाडांचा मोबदला उचलल्यानंतर त्याच जागेवर पुरावे लपवण्यासाठी नव्याने काजूची झाडे लावली जात आहेत का, याची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शहानिशा करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने किंवा विशेष तपास पथकाने ब्राह्मण खोरे परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, छायाचित्रे व व्हिडिओग्राफीद्वारे सबळ पुरावे संकलित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महसूल व वनविभागाकडील मूळ नोंदी, पूर्वी केलेले पंचनामे, नोंदवलेली झाडांची संख्या आणि प्रत्यक्षात वाटप झालेला निधी यांची पडताळणी करून बेकायदेशीर लाटलेला मोबदला शासनाने वसूल करावा व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही निवेदनात नमूद आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर मनसे कार्यकर्त्यांसह ब्राह्मण खोरे परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करेल, असा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे. दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणा जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



