राजापूर : तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल अशोक बिर्जे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जुवाटी (ता. राजापूर) येथील रहिवासी असलेले आणि सध्या विरार येथे व्यवसाय करणारे किशोर दिवाकर मयेकर (वय ३७) हे २ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपल्या भावोजींच्या घरासमोरील फणसाच्या झाडाखाली मित्रांसोबत उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या संशयित स्वप्निल अशोक बिर्जे (वय ४०, रा. बेनगी, पो. आडिवरे, ता. राजापूर) याने काही समजण्याच्या आत मागून येऊन मयेकर यांच्यावर धारदार कोयत्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात मयेकर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर वार बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमी मयेकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या प्रकरणी जखमी किशोर मयेकर यांनी नाटे सागरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित स्वप्निल बिर्जे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




