रत्नागिरी : अनेक वर्षांपासून विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतींना अखेर नवसंजीवनी मिळणार असून संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी १३ कोटी ४५ लाख रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संपूर्ण रुग्णालय परिसराचे नूतनीकरण आणि बळकटीकरणाचे व्यापक काम सध्या वेगाने सुरू आहे. जुन्या इमारतींची झालेली दैना, छताची पडझड, पावसाळ्यातील गळती आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे येथे दाखल असलेल्या रुग्णांसह वैद्यकीय प्रशासन व कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, मात्र आता सुरू असलेल्या या विकासकामांमुळे हा त्रास कायमचा दूर होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश २४ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आला असून, पुढील २४ महिन्यांच्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे निश्चित उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या थेट देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत रुग्णालयातील १३ वॉर्डांचे मुख्य बांधकाम, रूफिंग म्हणजेच छत दुरुस्ती, अंतर्गत व बाह्य भागातील दर्जेदार प्लास्टर तसेच प्लम्बिंगची कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरित आवश्यक कामेही वेळेत पूर्ण करून नियोजित मुदतीत प्रकल्पाची सांगता करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष भर दिला जात आहे.
या सर्वसमावेशक आधुनिकीकरणामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या मनोरुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, हवेशीर आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त वातावरण उपलब्ध होणार आहे. इमारतींच्या बळकटीकरणामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार असून, वैद्यकीय प्रशासनालाही रुग्णांना दर्जात्मक व तत्पर आरोग्यसेवा पुरवणे अधिक सोयीस्कर आणि सुलभ ठरणार आहे.






