गणपतीपुळे/ वैभव पवार: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) वतीने येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथील आधुनिक मराठी काव्याचे जनक कवी केशवसुत स्मारक संकुलात १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन दिमाखात रंगणार आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता कवी केशवसुत स्मारक संकुल मालगुंड येथे विशेष नियोजनात्मक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे औचित्य साधून १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा अधिकृत लोगो तसेच संमेलनाच्या ध्वजाचे भव्य अनावरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
या नियोजन सभेला व अनावरण सोहळ्याला रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण साबणे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल आणि मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीत केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ हे आगामी संमेलनाच्या रूपरेषेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते याच प्रसंगी पार पडणार आहे.
साहित्याची ही मांदियाळी यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाभरातील साहित्यिक आणि पदाधिकाऱ्यांची एकजूट महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कोमसाप रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीसह जिल्ह्यातील रत्नागिरी, मालगुंड, लांजा, राजापूर, देवरूख, गुहागर, चिपळूण, खेड व दापोली या सर्व शाखांचे पदाधिकारी, १८ व्या मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि विविध संयोजन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलन कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संमेलन कार्यवाह गजानन पाटील, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आणि जिल्हा सचिव मुश्ताक खान यांनी केले आहे.






