मुंबई (शांताराम गुडेकर): दिवाळी सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याच्या हेतूने खडवली येथील जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः फराळ तयार करून त्याचे थेट आदिवासी पाड्यात जाऊन वाटप करत माणुसकी आणि एकात्मतेचा आदर्श घालून दिला.
संस्थेच्या संचालिका सौ. कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. सौ. रसिका लोकरे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थिनींनी एकत्र येत दिवाळीचा पारंपरिक फराळ तयार केला आणि त्यानंतर खडवली परिसरातील आदिवासी पाड्यांवर जाऊन बांधवांना त्याचे सप्रेम वाटप केले. यावेळी प्रा. शफीक शेख, प्रा. घरात, प्रा. फर्डे, प्रा. मधु यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मोहिनी जाधव, कु. आफरीन शेख, कु. आरती पवार, कु. सारिका निपुर्ते, कु. ऋतुजा सोनावणे, कु. ऋतिका मोरे, कु. साक्षी जाधव, कु. प्रणिता गायकवाड, कु. एकता भस्मे, कु. सलोनी भालके, कु. लक्ष्मी भोईर, कु. साक्षी शेळके आणि कु. मनाली भालके यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
फराळ मिळाल्यानंतर आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान पाहून विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित झाला. सणाचा खरा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यातच असतो, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात उतरवला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थाचालक, संचालिका सौ. कविता शिकतोडे, सभासद डॉ. बी. एल. जाधव, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर तसेच उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे यांनी विद्यार्थिनींचे आणि प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.






