जाकादेवी / वैभव पवार: आंबेडकरी जलसा कलेतील गायन आणि वादन परंपरेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने धम्मक्रांती कला मंचाच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जाकादेवी येथे हार्मोनियम व ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुका व जिल्ह्यातील बौद्ध समाजातील नवोदित तसेच कार्यरत कलावंतांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे.
जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार आहे. आंबेडकरी जलसा कलेतील गायन पद्धतीनुसार हार्मोनियम आणि ढोलकी वादनाचे प्रशिक्षण यावेळी दिले जाणार आहे. अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून सहभागी कलावंतांना वादनाचे योग्य तंत्र आणि आवश्यक मार्गदर्शन मिळणार असल्याने नवोदित कलाकारांसाठी ही एक चांगली संधी ठरणार आहे.
विविध सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या धम्मक्रांती कला मंचाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. बौद्ध समाजातील बंधू-भगिनींनी आपल्या वाडी-वस्तीतील नवोदित तसेच कार्यरत कलावंतांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मंचाचे अध्यक्ष रविकांत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.




