दापोली : दापोली तालुक्यात सध्या पीक पाहणी सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर राबवले जात असून, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी मंगळवारी सायंकाळी आसूद गावाला धावती भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावात सुरू असलेल्या पीक पाहणी कामाची पाहणी करत उपस्थित सर्वेअरकडून आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आणि सद्यस्थितीचे अपडेट्स जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी थेट शेताच्या बांधावर उतरून आसूद परिसरातील भातशेतीची बारकाईने पाहणी केली.
यंदाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे वास्तव यावेळी समोर आले; अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये भाताच्या लोंब्यांत दाणे भरले नसल्याचे दिसून आले, तर काही भागांत पावसाअभावी उभी भातशेती अक्षरशः करपून गेल्याचे विदारक दृश्य त्यांच्या निदर्शनास आले. प्रशासनाकडून सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी मंडळ अधिकारी विनोद सिंग रजपूत, आसूदचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर यांच्यासह पीक पाहणी सर्वेअर निकेत बांद्रे व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.






