दापोली : दापोली येथील बीएसएनएल कार्यालयातील ओसी लॅन रूममध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून सुमारे ७ हजार रुपये किमतीची डीसी केबल चोरी केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५७ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत बीएसएनएल कार्यालयातील विजय राम मिना (वय ३५, रा. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी विशाल परशराम सर्वे (वय ३०, रा. सडवे, सुतारवाडी, ता. दापोली) याने बीएसएनएल कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या खिडकीवरील एसीचा दरवाजा बाहेरून तोडून व उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर रूममध्ये असलेली निळ्या व लाल रंगाची सुमारे ७ हजार रुपये किमतीची डीसी केबल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम 331(3), 305(e) तसेच घरफोडी व चोरीसंबंधीच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.
दापोलीतील बीएसएनएल कार्यालय फोडून ७ हजारांची डीसी केबलची चोरी
Leave a Comment





