जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या उपस्थितीत पक्षविस्ताराचा निर्धार
दापोली : आगामी काळातील राजकीय वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने दापोली तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला दापोली तालुक्यातील पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागापासून तालुकास्तरापर्यंत काँग्रेसचे विचार अधिक प्रभावीपणे पोहोचवणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वय वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पक्षीय उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी यावेळी उपस्थितांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पदाधिकाऱ्यांवर मदार न ठेवता प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरून प्रत्यक्ष काम करण्याचे आवाहन केले. गावपातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकजूट आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील समस्या आणि पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत आपली मते मांडली. नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य व्यासपीठावर न्याय मिळवून देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. दापोली तालुक्यात काँग्रेसची पकड अधिक मजबूत करण्यासाठी नियमित संवाद बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या बैठकीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे.





