दापोली : दापोली येथील मध्यवर्ती एसटी बस आगारात एसटी बसने दिलेल्या धडकेत एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित एसटी चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील दिवाण खवटी मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या फातीमा हमीद जोगीलकर (वय ६९ वर्षे) या गुरुवारी सायंकाळी दापोली एसटी आगारातून पायी बाहेर पडत होत्या. त्याच वेळी कोळबांद्रे बेजेवाडी ते दापोली मार्गावरील एसटी बस (क्रमांक MH 20 BL 2127) आगारात प्रवेश करत होती. ही बस आगारात नेत असताना चालक गोरख सुदाम चिंचकर (वय ४० वर्षे, रा. जालगाव, ता. दापोली, मूळ रा. कळसम, जि. बीड) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस भरधाव वेगात व बेदरकारपणे वळवली. अचानक घेतलेल्या या वळणामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि पायी जाणाऱ्या फातीमा जोगीलकर यांना बसच्या डाव्या बाजूने जोरदार धडक बसली.
ही धडक इतकी भीषण होती की महिला खाली कोसळल्यानंतर एसटी बसचे पुढील डाव्या बाजूचे चाक थेट त्यांच्या दोन्ही पायांवरून गेले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. स्थानकातील उपस्थित प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत तातडीने धाव घेतली व जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर दापोली शहरासह प्रवाशांमध्ये एसटी चालकांच्या वाढत्या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जखमी महिला फातीमा हमीद जोगीलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात चालक गोरख चिंचकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.





