दापोली: दापोली तालुक्यातील दाभिळ येथे वृद्ध नागरिकाच्या आजारपणाचा आणि नजरेचा फायदा घेत राहत्या घरातील बेडरूममधून सुमारे १० हजार रुपये किमतीची १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दाभिळ येथील रहिवासी इसाक याकुब दळवी (वय ७८) यांनी आपल्या घराच्या बेडरूममधील बेडच्या कोपऱ्यात स्वतःची परवानाधारक १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक ठेवली होती.
१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० ते ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या कालावधीत, फिर्यादी इसाक दळवी घरी असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या वृद्धत्वाचा व आजारपणाचा गैरफायदा घेऊन किंवा त्यांची नजर चुकवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ती बंदूक चोरून नेली. या चोरीत शिसमच्या लाकडी बट्टाची, खाकी रंगाची नायलॉनची स्लिंग असलेली आणि एसबीबीएल ३८२/१९७८ असा क्रमांक नमूद असलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची लोखंडी १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक चोरीस गेली आहे. अखेर याप्रकरणी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी इसाक दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दापोली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.







