मंडणगड: मंडणगड शहरातील भिंगळोली समर्थनगर परिसरात एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकरमधून तब्बल २ लाख १८ हजार ५८५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भिंगळोली समर्थनगर येथील रहिवासी राजश्री अरुण सुतार (वय ४८) यांच्या घरी ही चोरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री १०.३० या कालावधीत फिर्यादी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने संधी साधून घरात प्रवेश केला. त्याने थेट बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सुमारे २६.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये ९६ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, ६० हजार २१५ रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट तसेच ६२ हजार ३७० रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंगांचा समावेश आहे.
घरी परतल्यानंतर कपाटातील लॉकर उघडे दिसल्याने चोरीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी राजश्री सुतार यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.




