मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड ते महाड मार्गावरील शेणाळे-आतकोळ फाटा येथे कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जखमी झाले असून, कारचालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाल्याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित राजेंद्र जाधव (वय २५, रा. सडे जाधववाडी, ता. मंडणगड) हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-०४-एमझेड-४३२०) घेऊन मंडणगडहून महाडच्या दिशेने जात होता. शेणाळे-आतकोळ फाट्याजवळ आला असता त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवले. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एसटी बसला त्याच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात स्वतः कारचालक रोहित जाधव याच्यासह कारमध्ये बसलेला अस्मित महेंद्र जाधव (वय २२) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी एसटी बसचे चालक गजानन भारत गिरी (वय ४०, रा. भारत बेकरी शेजारी, एसटी स्टँडसमोर, दापोली) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित कारचालक रोहित जाधव याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ११८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या अपघाताचा पुढील तपास मंडणगड पोलिस करत आहेत.






