चिपळूण : आंबा-काजूच्या बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली. हरणाची वैद्यकीय व शारीरिक तपासणी केल्यानंतर ते सुस्थितीत असल्याची खात्री करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले आहेत.
शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी मार्गताम्हाणे खुर्द येथील सुतारवाडी परिसरात ही घटना घडली. येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना माहिती दिली.
माहिती मिळताच वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर), वनरक्षक कृष्णा इरमले (कोळकेवाडी) आणि आरआरटी पथकाचे सदस्य अथर्व घाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या प्राण्याची पाहणी केली असता तो ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरीण (Mouse Deer) असल्याचे स्पष्ट झाले.
या छोट्या वन्यजीवाची सुटका करण्यासाठी बचाव पथकाने तातडीने प्रयत्न सुरू केले. बचावकार्य सुरू असतानाच पिसोरी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत पथकाने काळजीपूर्वक जाळीच्या साहाय्याने त्याला सुरक्षितपणे पकडले आणि पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तसेच शारीरिक तपासणी करण्यात आली. हरीण पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. वन विभागाच्या पथकाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे दुर्मिळ पिसोरी हरणाला जीवदान मिळाले.





