चिपळूण: चिपळूण तालुक्यातील पोफळी मार्केट परिसरातील मानकर चाळीत भाड्याने राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील मूळ रहिवासी असलेला उदय नरसिंग निंबाळकर (वय २३) हा कामानिमित्त चिपळूण तालुक्यातील पोफळी मार्केट येथे मानकर यांच्या चाळीतील खोलीत भाड्याने राहत होता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या घराच्या छताच्या लाकडी वाशाला दोरी बांधून गळफास घेतला.
दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवला आणि पंचनामा केला. तरुणाने इतक्या टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २३/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




