चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे चिपळूणमधील पाग बौद्धवाडी आणि लगतच्या परिसरातील रहिवाशांना दररोज मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत असून, नागरिकांची ही होणारी प्रचंड गैरसोय आणि महामार्ग ओलांडताना उद्भवणारा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी तत्काळ उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे निवेदन नवी मुंबई येथील कोकण भवनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग सचिव संतोष शेलार यांना शिष्टमंडळाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले. हे निवेदन स्वीकारत सचिव संतोष शेलार यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडे तत्काळ पाठवून पाठपुरावा करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
सदर निवेदन सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, डॉ. अशोक सकपाळ, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे अध्यक्ष प्रभाकर सकपाळ तसेच सरचिटणीस सिद्धार्थ परशुराम जाधव आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल मंजूर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले असून, आता या जनहितैषी मागणीवर केंद्र सरकारकडून काय अंतिम निर्णय होतो, याकडे संपूर्ण पाग बौद्धवाडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




