सावर्डे/ विनायक सावंत: संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र तुरंबव येथील श्री शारदा देवी मंदिरात पारंपरिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि अलोट गर्दीत पार पडत आहे. उत्सवाच्या काळात दररोज हजारो भाविक आणि वाहनांची रीघ लागत असल्याने सावर्डे ते तुरंबव या मार्गावर निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीवर सावर्डे पोलिसांनी यशस्वी मात केली आहे. सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखलेल्या काटेकोर वाहतूक नियोजनामुळे हा प्रवास सुखकर झाला असून, भाविक आणि नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे मोठे कौतुक केले जात आहे.
दरवर्षी शारदोत्सवादरम्यान वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासासाठी भाविकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असे. भाविकांचा हा त्रास ओळखून यंदा सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एकेरी वाहतुकीचा प्रभावी निर्णय लागू केला. त्यानुसार सावर्डे येथून आबिटगावमार्गे तुरंबवकडे जाणारा मार्ग आणि तुरंबव येथून निवळी हायस्कूलमार्गे सावर्डेकडे परत येणारा मार्ग अशी सुटसुटीत रचना करण्यात आली. समोरासमोर येणाऱ्या वाहनांची कोंडी टळल्याने वाहनांचा प्रवाह अत्यंत सुरळीत सुरू राहिला असून, महत्त्वाच्या चौकांमध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करून व्यवस्थेला शिस्त लावली.
केवळ वाहतूक व्यवस्थेपर्यंत मर्यादित न राहता सावर्डे पोलिसांनी मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणवेशधारी पोलिसांसोबतच साध्या वेशातील पोलीस पथके परिसरावर करडी नजर ठेवून असल्याने सुरक्षित वातावरणात दर्शन घेणे भाविकांना शक्य झाले आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध भूमिकेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सावर्डे पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीची विशेष दखल घेत समाधान व्यक्त केले आहे.






