मंडणगड: मंडणगड–वेळास मार्गावरील मालेगाव येथील अत्यंत धोकादायक वळणावर आज मंगळवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अपघात झाला. अचानक समोर आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत तीन प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड आगाराची एसटी बस वेळासच्या दिशेने जात असताना मालेगाव येथील तीव्र वळणावर समोरून अचानक एक वाहन आले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक दाबला, मात्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उतरली. रस्त्यालगतच्या गवतावरून घसरत गेलेली बस शेजारील एका कंपाउंडच्या संरक्षक भिंतीवर जाऊन जोरात आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण बारा प्रवासी प्रवास करत होते. या धडकेत तीन प्रवाशांना मुका मार लागून दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या धडकेत एसटी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. घटनेची माहिती मिळताच बाणकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली. मालेगाव येथील हे वळण अत्यंत अरुंद आणि धोकादायक असल्याने येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असतात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.






