रत्नागिरीb: तालुक्यातील बालकांमधील कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य विभागाने सक्रिय पाऊल उचलले असून, उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे ‘सॅम-मॅम (SAM-MAM) लड्डू गोपाल योजने’अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ३६ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन बालकांना पौष्टिक लाडू तसेच सर्व बालकांना आवश्यक औषधोपचार पुरवण्यात आले.
हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालय दापोलीचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय पाटील यांनी उपस्थित बालकांची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीअंती तीव्र कुपोषित (SAM) व तीव्र कमी वजनाचे (SUW) एकही बालक आढळले नाही. मध्यम कुपोषित (MAM) १३, मध्यम कमी वजनाची (MUW) ७ तर सामान्य (Normal) श्रेणीतील १६ बालकांची नोंद झाली.तपासणीनंतर ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत गरजू ३२ बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले. तसेच बालकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पोषणमूल्ये वाढवण्यासाठी उपस्थित सर्व ३६ बालकांना टॉनिक, कॅल्शियम आणि आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अशा तपासण्या सातत्याने सुरू राहणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.





