दापोली (प्रतिनिधी): जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणही राष्ट्रीय क्षितिजावर स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवू शकतात, हे दापोली तालुक्यातील पांगारी-तर्फ हवेली, गोविंदशेत वाडी येथील शुभम काशिनाथ लोंढे याने सिद्ध करून दाखवले आहे. ताकद, अचूक तंत्र आणि मानसिक संयमाची कसोटी पाहणाऱ्या पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात शुभमने आधी राज्य आणि पाठोपाठ राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक पटकावत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.
पांगारी येथील निसर्गरम्य आणि साध्या वातावरणात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या शुभमला लहानपणापासूनच शरीरसौष्ठव व व्यायामाची आवड होती. पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याने वाणिज्य शाखेतून ‘टीवायबीकॉम’ची पदवी पूर्ण केली. शिक्षण घेत असतानाच त्याने आपल्या व्यायामाच्या आवडीला शास्त्रशुद्ध स्वरूप देण्याचे ठरवले. यासाठी इंटिग्रेटेड फिटनेस अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधून (IFSI) ट्रेनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या काळात त्याला निखिल अष्टीवाले सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मोठ्या साधनांपेक्षा अथांग मेहनत आणि सरावातील शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली मानून त्याने सराव सुरू ठेवला. सध्या तो मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील फ्लेक्स आयर्न जिममध्ये ट्रेनर व फिटनेस कोच म्हणून कार्यरत असून, स्वतःच्या सरावासोबतच इतरांनाही तंदुरुस्तीचे धडे देत आहे. या संपूर्ण प्रवासात अमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, महाराष्ट्रचे सचिव संतोष शिंदे सर यांच्यासह अनेक क्रीडा मार्गदर्शकांचे सहकार्य त्याला लाभले.
क्रीडा क्षेत्रातील त्याच्या कष्टांना नुकतीच मोठी फळे आली. ऑगस्टच्या सुरुवातीला पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या नेत्रदीपक यशामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दिल्लीतील पितमपुरा येथे आयोजित राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये देशातील नामवंत खेळाडूंसमोर आव्हान उभे करत शुभमने अत्यंत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा रौप्यपदक खेचून आणले.
पांगारीच्या लाल मातीतून सुरू झालेला हा प्रवास मुंबईमार्गे देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. परिस्थितीचे कोणतेही कारण पुढे न करता स्वतःच्या मनगटाच्या जोरावर मिळवलेले हे दुहेरी रौप्यपदक ग्रामीण भागातील असंख्य होतकरू युवकांसाठी नवी उमेद आणि प्रेरणा देणारे ठरले आहे. सध्या मुलुंड येथे वास्तव्यास असलेला शुभम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सरावात गढून गेला आहे.





