खेड : तालुक्यातील बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाट व लॉकर उघडून पाच हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत बोरघर-राहाटवाडी, ता. खेड येथे घडली. फिर्यादी सुधीर सिताराम पवार (वय ५०, व्यवसाय वकील, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) हे घरात नसताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुमजली घराच्या सेफ्टी दरवाजाला तसेच आतील दरवाजाला लावलेले दोन्ही लॉक हत्याराच्या साहाय्याने उचकटले.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने आतील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर लोखंडी कपाट व लॉकर उघडून त्यातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.४१ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३११/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास
Leave a Comment





