रत्नागिरी: गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी उसळी आली असून, किरकोळ बाजारात मोठ्या आकाराच्या नारळाने चक्क ५० ते ५५ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. उत्पादनात झालेली घट, सणांमुळे वाढलेली मागणी आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च या तिहेरी चक्रव्यूहामुळे नारळाच्या भावात ही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. किनारपट्टी भागाला गेल्या काही वर्षांत सतत बसलेला चक्रीवादळांचा तडाखा आणि प्रतिकूल हवामानाचा थेट फटका नारळ बागांना बसला असून, यंदा कोकणातील स्थानिक उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला स्थानिक उत्पादनात तूट असताना दक्षिण भारतातून होणाऱ्या आवक मार्गातही मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये सुमारे ५० टक्के नारळाची आवक कोल्हापूरमार्गे होत असते. मात्र सध्या वाहतुकीसाठी आंबाघाट बंद असल्याने नारळ वाहतुकीचा मार्ग बदलावा लागला आहे. परिणामी लांबच्या पल्ल्यामुळे व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी अधिकचा खर्च करावा लागत असून, त्याचा थेट भार अंतिम विक्री दरावर पडत आहे. घाऊक बाजारातही तेजीचे वातावरण असून नव्या नारळाचा दर सुमारे २,५०० ते २,८०० रुपये शेकडा, तर पालकोल नारळाचा भाव २,७०० ते २,८०० रुपये शेकडा झाला आहे. मद्रास नारळाचे दर तर यापेक्षाही अधिक असल्याचे बाजारातील स्थितीवरून स्पष्ट होत आहे.
घाऊक बाजारातील या दरवाढीचा सर्वाधिक तडाखा किरकोळ ग्राहकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात अवघ्या २० रुपयांच्या आसपास मिळणारा नारळ आता आकार आणि प्रतवारीनुसार थेट २५ ते ५५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या बाजारात लहान आकाराचा नारळ २५ ते ३५ रुपये, मध्यम आकाराचा नारळ ४० ते ४५ रुपये, तर मोठ्या आकाराचा नारळ ५० ते ५५ रुपये प्रतिनग या चढ्या दराने विकला जात आहे. धार्मिक विधी, पूजा तसेच सणासुदीच्या गोडधोड पदार्थांसाठी नारळाला प्रचंड मागणी असते. गणपतीपाठोपाठ नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असे सलग सण-उत्सव येत असल्याने पुढील दोन ते तीन महिने नारळाच्या दरातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातच मागणीच्या तुलनेत बाजारात पुरवठा कमी राहिल्यास किरकोळ दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत असून, सणासुदीच्या काळात नारळाने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे.





