रत्नागिरी : कुपोषणमुक्ती आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कटिबद्ध असलेल्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आज जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील डीईआयसी (DEIC) विभागात सॅम-मॅम तसेच दुर्धर आजारग्रस्त बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वालावलकर हॉस्पिटल डेरवण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तालुक्यातील एकूण ४८ बालकांची सखोल आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ४८ बालकांमध्ये ३ तीव्र कुपोषित (सॅम), ४२ मध्यम कुपोषित (मॅम), १ कमी वजनाचे (SUW) आणि २ दुर्धर आजारग्रस्त बालकांचा समावेश होता. या सर्व बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून काटेकोर तपासणी करण्यात येऊन योग्य त्या आरोग्यविषयक सूचना आणि औषधोपचार देण्यात आले. बालकांचे वजन योग्य प्रमाणात वाढावे आणि कुपोषणावर मात करता यावी यासाठी ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत ४५ गरजू बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित आहारतज्ज्ञांनी बालकांच्या आहाराचे नियोजन, सकस आहाराचे महत्त्व आणि पोषणाबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी वालावलकर हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. शर्वरी गमे, डॉ. श्रावणी गोसावी आणि डीईआयसी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत कांबळे यांनी उपस्थित राहून बालकांची तपासणी केली. याशिवाय आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, डीईआयसी कर्मचारी, आयसीडीएस विभागाच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती रत्नागिरीचे अधिकारी व कर्मचारी आणि विविध संबंधित विभागांच्या समन्वयामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. भावी पिढीच्या निरोगी आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि पालकांचे आभार मानण्यात आले.





