गणपतीपुळे (वैभव पवार): कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील लंबोदर गणपती मंदिर परिसरात आजपासून अत्यंत मंगलमय वातावरणात ‘सामवेद स्वाहाकार’ सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. समस्त ब्रह्मवृंद गणपतीपुळे यांच्या वतीने या भव्य धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत (आश्विन शुद्ध ११ ते आश्विन शुद्ध १४, शके १९४८) हा यज्ञयाग अविरतपणे चालणार आहे.
हिंदू धर्मातील चार प्रमुख वेदांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सामवेद हा प्रामुख्याने संगीत, उपासना आणि वैदिक मंत्रांच्या लयबद्ध गायनाशी संबंधित आहे. या सोहळ्यात वेदोक्त मंत्रोच्चार आणि वैदिक विधींच्या माध्यमातून मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे. यापूर्वी समस्त ब्रह्मवृंदांच्या चोख नियोजनात ऋग्वेद आणि यजुर्वेद स्वाहाकार यशस्वीरीत्या संपन्न झाले असून, त्याच परंपरेत यंदा सामवेद स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय पवित्र सोहळ्यात वेदमंत्र, ज्ञान आणि भक्तीचा अपूर्व संगम अनुभवायला मिळणार असून, पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांनी या मंगलमय स्वाहाकार सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन समस्त ब्रह्मवृंद गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.




