प्रत्यक्ष पाहणी करत तात्काळ उपाययोजनांचे संकेत
पाचल (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या परिसरात काल दिनांक ३० ऑक्टोबर रोजी थेट दोन बिबट्यांचा वावर उघडकीस आल्याने शाळा परिसर आणि संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे प्रचंड सावट पसरले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि ग्रामस्थांच्या भीतीचा हा संवेदनशील प्रश्न ऐरणीवर येताच ‘ग्रामीण वार्ता’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या वृत्ताची तत्काळ दखल घेत वनविभागाने तातडीने पावले उचलली असून, वरिष्ठ अधिकारी जयराम बावदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी विक्रम कुंभार आणि रेस्क्यू टीम मेंबर नितेश गुरव यांनी आज दुपारी प्रत्यक्ष शाळेच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. वनविभागाच्या पथकाने परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेत आवश्यक त्या तात्काळ उपाययोजना आखल्या असून लवकरात लवकर संपूर्ण परिसर बिबट्यांच्या वावरापासून मुक्त करण्याचे ठोस संकेत दिले आहेत.
या पाहणीदरम्यान पाचलचे सरपंच बाबालाल फरास सर, उपसरपंच आत्माराम सुतार, पाचल मंडळ अधिकारी संजय पवार, ग्रामपंचायत लिपिक कल्पेश सुतार, शिपाई नंदू पांचाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी सागरे तसेच पत्रकार तुषार पाचलकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता आणि ‘ग्रामीण वार्ता’च्या वृत्ताचा पडलेला तात्काळ प्रभाव यामुळे पालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.





