राजापूर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ ब्रिज येथे भरधाव हुंडाई गेट्झ कारने पुढे जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजापूर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बापूराव महादेव काटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अभिषेक रजनीनाथ सुर्वे (वय ४८, रा. मानसरोवर नीलकांत, हाईट पोखरण नं. २, उपवन लेक, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नोंदीनुसार, अभिषेक सुर्वे हा हुंडाई गेट्झ कार क्रमांक एमएच-०४-जीझेड-९०२९ घेऊन ठाणे ते मालवण असा प्रवास करत होता. वाटूळ ब्रिज परिसरात आल्यानंतर त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार हयगयीने, निष्काळजीपणे व अतिवेगाने चालविली. याचदरम्यान पुढे जात असलेल्या अशोक लेलँड ट्रक क्रमांक एमएच-०८-एच-२७२०च्या मागील बाजूस कारची जोरदार धडक झाली.
या धडकेत हुंडाई गेट्झ कार तसेच ट्रकचे नुकसान झाले. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, मोटार वाहन कायदा कलम १८४ तसेच भारतीय दंड विधानातील कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल
Leave a Comment





