राजापूर : गेल्या काही काळापासून ठप्प असलेली राजापूर आगाराची राजापूर–चुनाकोळवण–दसूरकोंड–साटवली ही एसटी बससेवा अखेर कालपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ही महत्त्वाची बसफेरी अचानक बंद पडल्यामुळे या मार्गावरील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज तब्बल ७ ते ८ किलोमीटरचा प्रवास पायी तुडवत करावा लागत होता. साटवली येथील रा. सी. बर्डे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजसह परिसरातील विविध शाळांमधील शेकडो मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत होता. अखेर या समस्येविरोधात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश आले असून, बस रस्त्यावर धावू लागल्याने विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडत समाधान व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांचे हे प्रचंड हाल पाहून दिव्यांग योगेश सखाराम पाजवे यांनी सर्व बाधित पालकांच्या वतीने स्वतः पुढाकार घेत या प्रश्नी प्रशासनाकडे दाद मागितली होती. त्यांनी आपल्या दिव्यांगत्वाची तमा न बाळगता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी विभाग नियंत्रक तसेच राजापूर एसटी आगार प्रमुख यांच्याकडे सातत्याने निवेदने आणि स्मरणपत्रे सादर करून योग्य वेळी पाठपुरावा केला. एसटी प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि उल्लेखनीय प्रयत्नांमुळे एसटी महामंडळाला नमते घेत ही सेवा पूर्ववत सुरू करावी लागली. या यशानंतर संपूर्ण पंचक्रोशीतून योगेश पाजवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना योगेश पाजवे यांनी, हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी या सर्वांच्या खंबीर पाठिंब्यामुळे तसेच सामूहिक सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे स्पष्ट केले. ही बसफेरी नियमित झाल्याने परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबली असून ग्रामस्थांनी एसटी प्रशासन, दिव्यांग योगेश पाजवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.





