रत्नागिरी : मिरकरवाडा बंदर परिसरात मोडकळीस आलेल्या व विनावापर नौका, नौका केबिन तसेच अनावश्यक साहित्य अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याने बंदरातील दैनंदिन कामकाज आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नौका मालकांनी आपल्या मालकीच्या नौका व अनावश्यक साहित्य स्वखर्चाने २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत हटवावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.
मिरकरवाडा बंदरातील अनावश्यक साहित्य हटविण्याबाबत सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे संबंधितांना सूचना दिल्या आहेत. निर्धारित मुदतीत मोडकळीस आलेल्या व विनावापर नौका तसेच इतर साहित्य हटविण्यात आले नाही, तर २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मत्स्यव्यवसाय विभागामार्फत थेट हटाव कारवाई करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या या कारवाईदरम्यान संबंधित साहित्याचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहणार नसून, नुकसानभरपाईचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नौका व साहित्य हटविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संपूर्ण कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेट्टी परिसरात अनधिकृत वाहन पार्किंगलाही सक्त मनाई करण्यात आली आहे. हटाव मोहिमेदरम्यान जेट्टीवर अनधिकृतपणे वाहने उभी करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे संबंधित नौका मालकांनी मुदतीपूर्वीच विनावापर नौका व अनावश्यक साहित्य हटवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत
Leave a Comment





