रत्नागिरी/ वैभव पवार: जिंदाल कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न, त्यांची वेतनवाढ आणि नांदिवडे येथे लोकवस्तीत नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात येत असलेले गॅस टर्मिनल त्वरित स्थलांतरित झाल्याचे जाहीर करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी प्रहार कामगार संघटना, प्रहार सामाजिक संघटना, स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार बांधवांच्या वतीने येत्या सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक जनतेच्या आणि कामगारांच्या हक्कांकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवण्यात आले आहे.
नांदिवडे व जयगड परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जिंदाल कंपनीकडून प्रशासनाच्या मदतीने लोकवस्तीत गॅस टर्मिनल उभारण्याचे नियोजन सुरू असून, स्थानिक जनतेवर हा अन्यायकारक निर्णय लादला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रांच्या आधारे हे काम नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने यापूर्वी २७ मे २०२५ रोजी या कामाला स्थगितीचे आदेश दिले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही स्थानिकांचा विरोध डावलून पुन्हा हालचाली सुरू करण्यात आल्याने जनतेमध्ये तीव्र संताप आहे. वीजनिर्मिती प्रकल्प असूनही खंडित वीजपुरवठा, कोळसा व राख यांमुळे पसरणारे वाढते प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्या यामुळे स्थानिकांचे जीवन त्रस्त झाले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यापूर्वी कंपनीवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. अशा परिस्थितीत रहिवासी भागात गॅस टर्मिनल न उभारता ते गावाबाहेर स्थलांतरित झाल्याचे ३० ऑक्टोबरपर्यंत अधिकृतपणे घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला, जिंदाल कंपनीत मागील १७ ते १८ वर्षांपासून राबणाऱ्या कामगारांना आजही अवघ्या १० ते १२ हजार रुपयांच्या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असून, वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याची व्यथा प्रहार कामगार संघटनेने मांडली आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही कामगारांच्या वेतनात समाधानकारक वाढ झालेली नाही आणि इतर समस्याही सोडवण्यात आलेल्या नाहीत. या संदर्भात ३० ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाला निर्देश देऊन कामगारांच्या समस्यांचे लेखी स्वरूपात निवारण न केल्यास, २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार आमरण उपोषणास बसणार आहेत आणि मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाहीत, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन प्रहार सामाजिक संघटनेच्या कोकण महिलाध्यक्षा सौ. काजल परेश नाईक, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष व कायदेशीर सल्लागार स्वप्निल पाटील, आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या आंदोलनात प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष रोहन रमेश सुर्वे, उपाध्यक्ष सागर अनंत सुर्वे, सचिव सुरज मनोहर खाडे, उपसचिव अभिजित रविंद्र सावंत, खजिनदार अनिकेत तुळशीदास सुर्वे, उपखजिनदार मिलिंद अशोक आडाव, कामगार संघटक सुनील सुभाष खाडे, तसेच आरती सुर्वे व सिद्धाई सुर्वे यांच्यासह शेकडो शेतकरी, मच्छीमार आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रशासनाने या गंभीर विषयावर तात्काळ तोडगा काढून शेतकरी, मच्छीमार आणि कामगारांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.





