रत्नागिरी: शहरातील नाचणकर चाळ परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई करत रत्नागिरी शहर पोलिसांनी एका सराईत संशयिताला रंगेहात पकडून त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. सूरज परशुराम नंदिवले (वय २४, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरात नियमित गस्त घालत असताना, एनडीपीएस गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला सूरज नंदिवले हा नाचणकर चाळ भागात संशयास्पदरीत्या हालचाली करताना पथकाच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला १ किलो २०१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर अमली पदार्थासह सुमारे ६० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतिश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास शहर पोलीस करत आहेत.





