रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अमली पदार्थांची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने हेरॉईनसदृश पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन संशयित आरोपींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ८.० ग्रॅम हेरॉईनसदृश अमली पदार्थ आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिली कारवाई १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली करण्यात आली. या कारवाईत अलमहीब असगर सोलकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) याच्याकडून हेरॉईनसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्लास्टिक पिशवीसह त्याचे वजन ४.५ ग्रॅम, तर निव्वळ अमली पदार्थाचे वजन २.५ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या ५२ पुड्या तयार करण्यात आल्या होत्या. या पदार्थाची किंमत २६ हजार रुपये, तसेच २० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(अ), २१(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरी कारवाई १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील निवखोल येथे लाला कॉम्प्लेक्ससमोरील इलेक्ट्रिक पोलजवळ करण्यात आली. या कारवाईत तनवीर युसूफ मुल्ला (५२, रा. राजीवडा, बडये मशीदजवळ, रत्नागिरी) याच्याकडून हेरॉईनसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्लास्टिक पिशवीसह पदार्थाचे वजन ३.५ ग्रॅम असून, त्याच्या ३२ पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या पदार्थाची किंमत १६ हजार रुपये असून, १९ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विनोद विश्राम कदम यांनी फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २१(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला पदार्थ हेरॉईनसदृश असल्याचे प्राथमिक स्वरूपात नमूद करण्यात आले असून, त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास व नमुना परीक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी शहरात अमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या सलग कारवायांमुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई; हेरॉईनसदृश पदार्थासह दोघे ताब्यात
Leave a Comment





