रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) २०२६’ अंतर्गत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नव्या निर्णयानुसार आता नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, नवमतदारांना नावनोंदणीसह दुरुस्तीची आणखी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने या सुधारित कार्यक्रमास मंजुरी दिली असून, आता अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, प्राप्त हरकतींचा निपटारा आणि नोटीस प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. दरम्यान, अधिकाधिक पात्र नागरिकांना आणि नवमतदारांना यादीत नाव समाविष्ट करता यावे, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित राहून प्रारुप यादीतील नावांची पडताळणी, दुरुस्तीचे अर्ज आणि नवमतदारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम करणार आहेत.
प्रारुप यादी प्रसिद्धीनंतर ज्या नागरिकांना ‘अनमॅप्ड’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रिपन्सी’ संदर्भात सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांना प्रत्यक्ष कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नसून निवडणूक आयोगाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतः मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करतील, तसेच मतदारांना व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आपली कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. केवळ अपवादात्मक स्थितीत उपलब्ध माध्यमांद्वारे ऑनलाइन सुनावणी घेतली जाईल, ज्यासाठी स्वतः मतदार अथवा त्यांच्या घरातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते. जिल्ह्यातील सर्व पात्र नवमतदारांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेत नावनोंदणी पूर्ण करावी आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






