रत्नागिरी : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आलेल्या तापानंतर डाव्या पायाला पोलिओ झाला आणि चालण्याची क्षमता हिरावली गेली. मात्र शरीराने दिलेला हा अडथळा मनाच्या जिद्दीसमोर कधीच मोठा ठरला नाही. शिक्षणाची आस, आत्मविश्वास आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी या बळावर तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील शाकीरा मोहम्मद कुरेशी (४५) यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आयुष्यातील अनेक चढ-उतारांना सामोरे जात आईची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली. आता १६ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, मुंब्रा, मुंबई येथील टेलरिंग व्यावसायिक आणि स्वतःही पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले शमशुद्दीन अन्सारी यांच्यासोबत त्यांचा विवाह उद्यमनगर, रत्नागिरी येथे संपन्न झाला.
शाकीरा यांच्या बालपणीच नियतीने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले. चार वर्षांच्या असताना ताप आल्यानंतर त्यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला. त्यानंतर चालता येणे बंद झाले. उपचारासाठी त्या आईसोबत बेळगाव येथे राहिल्या. उपचार झाले, मात्र पूर्वीसारखे चालणे शक्य झाले नाही. तरीही या शारीरिक अडचणीमुळे त्यांची शिक्षणाची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द कमी झाली नाही.
तुळसणी येथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात वडील मोहम्मद कुरेशी सायकलवरून त्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात असत. पुढे त्यांच्या शाळेत ये-जा करण्यासाठी एका मुलाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर देवरुख येथे रिक्षाने ये-जा करत त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १७व्या वर्षी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर कॅलिपरच्या मदतीने त्यांनी पुन्हा हळूहळू चालण्यास सुरुवात केली. शारीरिक अडचणींची पर्वा न करता पुढील शिक्षण साखरपा येथे पूर्ण करत त्यांनी पदवीपर्यंत मजल मारली.
शाकीरा यांचे वडील मोहम्मद कुरेशी वैद्यकीय व्यवसाय करत होते, तर आई सफिया कुरेशी गृहिणी आहेत. दोन भाऊ आणि दोन बहिणी विवाहित असून, वडिलांच्या निधनानंतर आईची जबाबदारी शाकीरा यांनी स्वीकारली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि विविध परीक्षा दिल्या. दरम्यान, सिंधुदुर्ग येथील स्वप्ननगरीमधील काजू प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सुमारे सहा महिने नोकरी केली. मात्र वडिलांची प्रकृती खालावल्याने नोकरी सोडून त्यांना घरी परतावे लागले. त्यानंतर वडिलांचे निधन झाले आणि आईची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
या काळात एका वृत्तपत्रात आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी दिलेली जाहिरात त्यांच्या वाचनात आली. त्या माध्यमातून त्यांची सादिक नाकाडे यांच्याशी ओळख झाली आणि पुढे त्या आरएचपी फाउंडेशनच्या सभासद झाल्या. संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सुविधा आणि उपक्रमांची माहिती त्यांना मिळाली. आवश्यक त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मदतही मिळाली.
आयुष्याच्या या संघर्षमय प्रवासानंतर १६ सप्टेंबरचा दिवस शाकीरा यांच्या आयुष्यात विशेष ठरला. मुंब्रा, मुंबई येथे टेलरिंग व्यवसाय करणारे आणि स्वतःही पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले शमशुद्दीन अन्सारी यांच्यासोबत त्यांचा विवाह उद्यमनगर, रत्नागिरी येथे पार पडला. आयुष्यातील संघर्ष जवळून अनुभवलेल्या या दोघांनी आता एकमेकांच्या साथीने नव्या संसाराची सुरुवात केली आहे.
या विवाह सोहळ्याला आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाचे सचिव युसारा पन्हाळेकर आणि सदस्य शगुफ्ता नाईक यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी आनंद, प्रेम, समाधान आणि सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
शाकीरा कुरेशी यांचा जीवनप्रवास हा केवळ संघर्षाची कहाणी नाही, तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द, शिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनाला नवी दिशा देता येते, याचे उदाहरण आहे. पोलिओने त्यांच्या पावलांना अडथळा आणला; मात्र त्यांच्या स्वप्नांची वाटचाल थांबवू शकला नाही. शिक्षण पूर्ण करण्यापासून आईची जबाबदारी पार पाडण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले. आता शमशुद्दीन अन्सारी यांच्या साथीने त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, या नव्या वाटचालीत दोघांची परस्पर साथ त्यांच्या जीवनाला अधिक समृद्ध करणारी ठरेल.
पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट
Leave a Comment





