नवी दिल्ली : नववर्षापासून बँकेच्या चेकबुक वापराबाबत नवे नियम लागू होणार असल्याचा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचा दावा करणारी नोटीस अनेकांच्या मोबाईलवर पोहोचली आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत आधार नसून ही नोटीस बनावट असल्याचे खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केले आहे. त्यामुळे चेकबुकसंदर्भातील कथित बदलांमुळे संभ्रमात पडलेल्या बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या या नोटिशीवर ‘RBI New Cheque Book Rule From 1 Jan 2027’ असा मजकूर नमूद करण्यात आला आहे. या माध्यमातून आगामी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून चेकबुक वापरण्याच्या पद्धतीत बदल होणार असल्याचे भासवले जात आहे. अनेक वापरकर्ते या माहितीची सत्यता न तपासताच ती इतरांपर्यंत पोहोचवत असल्याने बँक ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या प्रकाराची दखल घेत रिझर्व्ह बँकेने ७ नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. व्हायरल होत असलेल्या नोटिशीचा फोटो शेअर करत त्यावर स्पष्टपणे ‘FAKE’ असा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकसंदर्भात कोणताही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश दिशाभूल करणारा असल्याचे अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, बँकिंग व्यवहारांशी संबंधित नियमांबाबत चुकीची माहिती पसरवून ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती किंवा संभ्रम निर्माण होण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. विशेषतः सरकारी संस्थांच्या नावाने बनावट नोटिसा तयार करून त्या खऱ्या असल्याप्रमाणे प्रसारित केल्या जातात. अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.
बँक ग्राहकांनी चेकबुक किंवा अन्य बँकिंग सुविधांबाबत कोणतीही नवीन सूचना मिळाल्यास रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून तिची खातरजमा करावी. केवळ व्हायरल संदेशाच्या आधारे बँकेच्या नियमांमध्ये बदल झाल्याचे गृहीत धरू नये. तसेच खात्री नसलेली माहिती पुढे पाठवणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.





