संगमेश्वर: आपल्या धारदार लेखणीच्या आणि तत्पर समाजकार्याच्या बळावर ग्रामीण पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचे सुपुत्र तथा ‘ग्रामीण वार्ता’चे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सिकंदर युसुफ फरास यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ या नामांकित संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ सिकंदर फरास यांना जाहीर करण्यात आला आहे. हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आगामी २२ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.
संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या व्यथा, दुर्गम गावांमधील पायाभूत सुविधांची वानवा, रस्ते, वीज, पाणी आणि प्रशासकीय दिरंगाई यांसारख्या गंभीर समस्यांना त्यांनी आपल्या निःपक्षपाती पत्रकारितेतून सातत्याने वाचा फोडली आहे. केवळ समस्या मांडून न थांबता, त्या तडीस लावून अनेक क्लिष्ट प्रश्नांची प्रशासकीय दरबारी सोडवणूक करण्यासाठी त्यांनी नेहमीच सक्रिय पाठपुरावा केला आहे. त्यांच्या याच निर्भीड, लोकहितैषी आणि रचनात्मक पत्रकारितेची दखल घेत ‘वर्ल्ड फॉर नेचर इंडिया’ संस्थेने त्यांची या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. सिकंदर फरास यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे ‘ग्रामीण वार्ता’ परिवारासह संपूर्ण संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांचे पत्रकारिता, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा सर्वच स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.




